| Date: 2026-07-13

डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. १ जुलै ते ७ जुलै २०२६ या कालावधीत ‘वन महोत्सव सप्ताह’ साजरा करण्यात आला. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि सृष्टीचे बिघडलेले संतुलन याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘एक विद्यार्थी एक झाड’ या संकल्पनेतून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेकडो झाडांची लागवड केली. केवळ लागवडीपुरते मर्यादित न राहता, कार्यक्रमात पर्यावरणस्नेही उपक्रम राबवण्यात आले. टाकाऊ वाहनांच्या टायरचा वापर करून आकर्षक कुंपण तयार करण्यात आले आणि त्याचे सुशोभीकरण करून प्रांगण अधिक हिरवेगार व सुंदर बनवण्यात आले. यामध्ये जैवविविधता वाढवणारी, वन, वृक्ष आणि औषधी वनस्पतींची विशेष लागवड करण्यात आली. यामुळे महाविद्यालयाचे परिसर हिरवेगार आणि पर्यावरणस्नेही बनले आहे.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना आणि एनएसएस चमूला प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाचे शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव आढाव यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश देवकर, प्रा. अनंता तीतरे, प्रा. साक्षी पाटील आणि प्रा. भावेश मंडवाले यांनी केले. सर्व एनएसएस विद्यार्थ्यांसोबत श्री योगेश शेळके आणि श्री हर्षल पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
हा सात दिवसीय उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यास तसेच समाजात सकारात्मक बदल घडवण्यास उपयुक्त ठरला. महाविद्यालय प्रशासनाने अशा उपक्रमांना भविष्यातही प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले आहे
Connecting Aspirations, Engineering Excellence