| Date: 2026-08-19

इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे व मा. सचिव कु. तन्वीताई गोडे यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांच्या सहकार्याने डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयातर्फे पंढरपूरहून परतीचा प्रवास करणाऱ्या भाविक भक्तांसाठी प्रथमोपचार व नि:शुल्क औषध वितरण शिबिर आयोजित करण्यात आले.
या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकातील स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भाविकांची मनोभावे सेवा केली. थकलेल्या भाविकांना क्षणभर विश्रांती मिळावी व पायांना आराम मिळावा यासाठी मिठाच्या गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच गरजूंना विविध प्रकारची औषधे व प्रथमोपचाराची सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक भाविकामध्ये देवाचे रूप पाहून स्वयंसेवकांनी सेवाभावाने कार्य केले.
या सेवाकार्यासाठी अन्नकुटी परिवार, शेगाव यांनी निवास व भोजनाची व्यवस्था करून मोलाचे सहकार्य केले. तसेच शेगाव येथील फार्मासिस्ट बंधू उज्वल जावरकर व सतिश सातव यांचे गेल्या तीन वर्षांपासून सातत्यपूर्ण सहकार्य लाभत आहे. मलकापूर येथील ड्रगिस्ट अँड केमिस्ट बांधवांचेही दरवर्षीप्रमाणे अमूल्य सहकार्य मिळाले. यशोधाम पब्लिक स्कूल परिवाराने संपूर्ण टीमच्या ये-जा करण्यासाठी बस उपलब्ध करून दिली.
या शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. मंगेश देवकर, प्रा. अनंता तीतरे, प्रा. अमित कुडके, प्रा. आशिष राठी, प्रा. विकास घाईट, प्रा. साक्षी पाटील, प्रा. श्वेता राणे, प्रा. मोहिनी क्षीरसागर, श्री. योगेश शेळके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.
या उत्कृष्ट वैद्यकीय व सामाजिक सेवेसाठी महाविद्यालयाचे शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. व्ही. एस. अढाव यांनी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले. नि:स्वार्थ सेवेतून मिळणारे समाधान आणि आनंद हा दरवर्षी नवीन अनुभव देतो. अशीच अविरत सेवा करण्याची संधी सदैव मिळावी, हीच श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना.
Connecting Aspirations, Engineering Excellence